आज १५ डिसेंबर, जागतिक चहा दिन...

आज १५ डिसेंबर, जागतिक चहा दिन...
------------------------
पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी 2005 पासून 15 डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, भारत आणि टांझानिया येथे साजरा होतो. हा साजरा करण्यामागचा हेतू असा की, जागतिक चहा व्यापाऱ्यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.

वर्ल्ड सोशल फोरमच्या 2004 मधील चर्चासत्रात नवी दिल्लीत हा दिवस 2005 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्याचे ठरले. नंतर 2006 आणि 2008 मध्ये श्रीलंकेत जागतिक स्तरावर साजरा झाला. 2015 साली भारताने प्रस्ताव केला की, चहा दिन हा जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनांमार्फत पोहोचवण्यात यावा.

>> चहाची कथा

चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.

इति चहा पुराण संपन्नम