“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” अशी प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी घेतो. कधी विचार केला आहे का, की हा माझा देश कसा आहे? इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे? आणि कुणालाही भारतीय आहे म्हंटल्यावर इतका अभिमान का वाटतो?कारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही!
एका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एव्हडी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. काश्मीरला युरोप सारखा बर्फ आणि गोरी पान माणसे आहेत, आसाम मणिपुरी ला चिनी लोकांसारखी माणसे आहेत, पंजाब मध्ये अफगाणिस्तानी लोकांसारखी पंजाबी आहेत तर अगदी दक्षिणेला काळी माणसे आहेत. अरब देशासारखे वाळवंट आहे तर काझीरंगा ला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात?
खरोखर अभिमान वाटण्यासारखी, अनादि काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. जगातल्या सगळ्या जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती होती आपल्या भारतामध्ये! असे म्हणत की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात अतिश्योक्ति जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते. आणि थैल्या भरून-भरून संपत्ति घेऊन जात होते.
त्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण काळ ओसरायला लागला. एखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला व्रात्य पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसे वायव्येच्या खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली.
काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्या वेळेला त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. राजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते. ह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ति लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला.
जरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणार्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, महान लोकांना, प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने शून्याचा शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत.
पूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती. सार्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते. त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक कोंग्रेसच्या एकाच झेंड्याखाली इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खर्या अर्थानी अखंड भारत झाला.
विविधतेत एकता ही संकल्पना उदयाला आली. सगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला. आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही पद्धतीने राज्य सुरू झाले. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्या मुळे सगळ्या देशाने कंबर कसून हयातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला.
विद्वानांची भारतात खाणच आहे; त्या मुळे आपण आता अवकाशयान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो. डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या तोडीस तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.
उद्योगांमध्ये सुद्धा टाटा, जिनदाल, अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे. ‘जय जवान जय किसान’ हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे.
भारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत. उत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे. दहशतवादाने भारत पुर्णपणे पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. बेकारी वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.
ह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही प्रगतीच्या दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे.