शेतकर्याची आत्मकथा

शेतकरी म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?
शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान ,कर्जमाफी मिळवण्याची असते .व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो . मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण ह्याच चक्रातुन गेलो आहे. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येउन ठेपलों. एवढ्यात मला एक समाजसेवक भेटला.
त्याने माझी कहाणी मन लावून ऐकून घेतली.आणि सांगितले की, आता परिस्थिती बदलू लागली आहे .आता शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्र आली आहेत. त्यामुळे मानवी श्रम खूप कमी प्रमाणात लागतात. पाण्यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे व धरणं बांधली आहेत. व बांधत आहेत. तसेच आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. तसेच पाण्याचे नियोजन ही करत आहेत म्हणजेच ‘ पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ह्या मुळे पावसावर असलेले अवलंबित्व हळू हळू कमी होत आहे. ही सर्व परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल ,ह्यातून मार्ग काढावा लागेल असे तो मला म्हणाला. मी पण मनाशी ठरवले मी रडत बसणार नाही, आत्महत्या करणार नाही.
सर्व प्रथम मी शेतीला पूरक असा जोड धंदा सुरु केला. त्या साठी मी दोन गाई व दोन म्हशी घेतल्या. त्या मुळे मला दिवसाला वीस लिटर म्हशीचे वपंधरा लिटर गाईचे दूध मिळू मिळण्यास सुरवात झाली। त्यातून मला रोज १५०० ते २००० रुपये मिळू लागले. खर्च वजा जाता ८०० ते १००० रुपये रोज नफा मिळू लागला. त्यामुळे मला शेती साठी लागणारे भांडवल उभे राहू लागले. तसेच गाईच्या, म्हशीच्या शेणापासून मला खत मिळू लागले. त्यामुळे मला येणारा रासायनिक खताचा खर्च कमी झाला. व सेंद्रिय खतामुळे उत्पादनाला बाजारात भाव चांगला मिळतो. अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जेवण्या खाण्याची सोय केली. व शेतीसाठी भांडवल ही उभे केले.
नंतर मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यामुळे मला शेतीसाठी लागणार्या मजुरीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. तसेच मी विहीर खणून ठिबक सिंचन ही करून घेतले. त्यामुळे मला आता वर्षातून दोन पिके घेता येऊ लागली. त्यामुळे माझी वार्षिक मिळकत दुप्पट झाली. मी मागच्या व ह्या वर्षांचा विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की :
१] जोडधंद्या मुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचण झाली नाही .
२] जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला शेतीसाठी लागणारे भांडवल उभे राहिले .
३] भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण (विहीर खणणे,ट्रॅक्टर ,ठिबक सिंचन )वैगेरे करता आले.
४] यांत्रिकीकरणा मुळे होणाऱ्या मजुरीच्या खर्चात जवळपास ५०% बचत झाली.
५] सेंद्रीय खतामुळे रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे वाचला .
६] सेंद्रिय खत मुळे मला सेंद्रिय धान्य मिळाले. त्याचा भाव जवळपास दुप्पट मिळाला.
७] तसेच विहीर खणल्यामुळे व ठिबकसिंचन केल्यामुळे दोन पिके घेता आली .
त्यामुळे माझे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. व रोज लागणाऱ्या खर्चाची व भांडवलाची व्यवस्था झाली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची सोय झाली .
आता मी मागील वर्षी आलेल्या अडचणींचा विचार केला असता माझ्या लक्षात आले :
१] पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार .
२] शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.
३] अवकाळी पावसापासून बचाव.
४] योग्य पिकाची निवड करणे .
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मला पुढील वर्षी योग्य पीक घ्यावे लागेल. ज्याला कमी प्रमाणात पाणी लागेल. ठिबकसिंचनामुळे ते होईल ह्याची मला खात्री आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी पारंपरिक धान्य न घेता दुसरे काही पीक म्हणजेच फळभाजी ,पालेभाजी ,फुलशेती वैगेरे काही घेता येईल का ह्याचा विचार करणे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणे. तसेच शेडनेट किंवा ग्रीन नेट किंवा पॉलीहाऊसे असे काही करता येईल का ह्याचा विचार करणे. तसेच धान्याची साठवणूक करणे. म्हणजे योग्य भाव आल्यास विकता येईल ह्याचा विचार करणे.
पहिल्यांदा ही सर्व परिस्थिती मलाच बदलावी लागेल. ह्या गोष्टी बदलण्यास सरकार व अनेक स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. तसेच आता ह्या व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. सरकार सुद्धा ठिबकसिंचन ,विहीर ,ग्रीननेट ,पॉलीहाऊसे ह्या करता ५०%सबसिडी देत आहे .बँक ४%दराने कर्ज देत आहे.
ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन योग्य ते नियोजन करून मी पुढील वर्षी आणखीन चांगल्या रीतीने शेती करून परिस्थिती बदलवून दाखविल ह्याची मला खात्री आहे. शेवटी आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले आहेत ‘जय जवान जय किसान’