श्रीमंत बाजीराव पेशवे

*श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती*
____________🌹_____________
*जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००*   
*मृत्यू    :  इ.स. २८ एप्रिल १७४०*

         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.

             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.

             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.

*॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥*

अशी बाजीरावांची मुद्रा होती.

            *कुशल सेनापती*

         बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.

             घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

*रावेरखेडी :*

            *२८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.*  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.

आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.
〰〰〰〰〰〰