सोमवारची फाईल

सोमवारची फाईल

"बाबा आले, बाबा आले!" लेकीची अखंड बडबड चालू होती! चिमुकल्या हातात बाबांची बॅग धरता येत नव्हती तरीही बाबांच्या बरोबरीने बॅग ढकलण्याचा तिचा उत्साह अवर्णनीय होता! एका हाताने बॅग खेचत दुसऱ्या हाताने ती बाबांना ओढत घरात आणत होती! शेवटी तिच्या उत्साहापुढे बाबांनी हार मानली. हातातील बॅग बाजूला ठेऊन आधी तिची छानशी पापी घेतली, कडेवर घेतलं तिला आणि मगच घरात प्रवेश केला! त्या बापलेकीकडे एक हसरा कटाक्ष टाकून तिनेच मग बॅग घरात आणली आणि दार लावून घेतले. आता लेकीकडून बाबांची लवकर सुटका होणे कठीण आहे या विचारताच ती कामाला लागली.

बाबा कधी येणार असे सारखे प्रश्न विचारून लेक तिला भंडावून सोडत असल्यामुळे थोडासा स्वयंपाक अजून राहिला होता. त्यामुळे जेवण होऊन ती निजल्याशिवाय त्याच्याशी निवांतपणे बोलणे शक्यच नव्हते! पटापट आवरून तिने ताटं घ्यायला सुरुवात केली. सारं काही तिच्या अंदाजानुसार घडत गेलं. लेकीला कडेवर घेऊनच त्याने हातपाय धुतले, कसंबसं थोडंफार आवरून तिला घेऊनच तो डायनिंग टेबलापुढे खूर्ची ओढून बसला. कालवून तयार ठेवलेला मऊ मऊ वरणभात तिला भरवू लागला. त्यातच तिला अख्ख्या आठवड्यातील गोष्टी सांगायच्या होत्या बाबांना. तिचे तोंड काही मिटत नव्हते.

समोरच्या खूर्चीवर दोन्ही हातांच्या जुडीत चेहरा ठेऊन ती त्यांच्या प्रेमाचा आस्वाद घेऊ लागली. बघता बघता आपण कधी भूतकाळात गेलो, तिचे तिलाच समजले नाही. लेकीच्या जागी ती होती आणि त्याच्या जागी तिचे बाबा! अशीच होती ती बाबा वेडी!

ते जेव्हा जेव्हा सुट्टीसाठी यायचे, तेव्हा ती ही अशीच मिठी मारायची त्यांना! ते तर महिना महिना बाहेर असायचे. सैन्यात होते ना ते!  घरात आई, दादा आणि ती! रोज रात्री झोपताना " बाबा कधी येणार गं?" असं म्हणत आईला भंडावून सोडायची! आणि बाबा आले की त्यांना काय सांगू, काय नको असे होऊन जायचे तिला! ते ही तितक्याच तन्मयतेने तिच्या गोष्टी ऐकायचे. आई सारखी म्हणायची  'अती लाडाने बिघडवून ठेवाल तिला' म्हणून! रागवायची सुद्धा कधी कधी! पण बापलेकीचं विश्वच वेगळं होतं जणू! दादा बिचारा कधी हट्ट नाही करायचा. तशी ती ही शहाणी होती पण बाबा घरी असले की मग मात्र तिचे बाबांवाचून पान हालत नसे. तिच्या सगळ्या मैत्रिणी, त्यांची भांडणे, शाळेतल्या गमती जमती कित्ती कित्ती सांगायचं असायचं तिला! बाबांचीही ती तितकीच लाडकी होती! शांतपणे ऐकून घ्यायचे सगळे ते! तिलाही त्यांच्या गमती जमती सांगायचे.

नंतर नंतर बाबा आल्यावर तिला नेहमी एक फाईल धरायला द्यायचे. "ही माझी 'सोमवारची फाईल' आहे हं! नीट सांभाळून ठेव! कामावर जाताना लागेल तेव्हा दे आठवणीने मला!" मोठी जबाबदारीच जणू! तिलाही मग खूप खूप मोठं झाल्यासारखा वाटायचं! अगदी खजिन्यासारखी जपून ठेवायची ती फाईल. सुट्टी संपवून, सोमवारी कामावर जाताना बाबा जेव्हा फाईल मागायचे तेव्हा धावत जाऊन ती आणून द्यायची. बाबांनी शाबासकी दिल्यावर धन्य धन्य वाटायचं तिला!

मोठी झाल्यावरसुद्धा तिची ही सवय गेली नाही. बाबा सुट्टीसाठी आल्यावर तिला ही 'सोमवारची फाईल' द्यायचे. ती एखाद्या अमूल्य ठेव्यासारखी सांभाळायची आणि सोमवारी कामावर जाताना आठवणीने आणून द्यायची! बाबांचा हसरा चेहेरा, ती शाबासकी तिच्यासाठी सर्वस्व होतं. दादा हसायचं, चेष्टा करायचा पण तिने नेम सोडला नाही. " ही काही बाबांची कामाची फाईल नाही काही! तू खूप मागे लागते म्हणून तुला गुंतवून ठेवायला बाबा ही कोरी पानं देतात तुला! काही कळत नाही तुला. 'सोमवारची फाईल' म्हणे!" दादा खूप चिडवायचा, पण तिचा बाबांवरचा विश्वास कधी उडाला नाही कि तिने फाईल चोरून उघडण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. हे बाबांचं खूप मोठं, महत्वाचं काम आहे आणि आपण ते जबाबदारीने पार पाडायला हवं ही पक्की खूणगाठ बांधली होती मनाशी तिने.

करता करता वर्षं उलटली! पण थकून भागून आलेल्या बाबांच्या हातातली ती 'सोमवारची फाईल' जपूनठेवण्याचा तिचा क्रम कधी चुकला नाही!

नंतर तिचे लग्न झाले. ती सासरी निघाली आणि बाबांनी तिच्या हातात निघताना ती फाईल दिली! कायमची! "तुझ्यासाठीच आहे, वाच तुला वेळ मिळेल तेव्हा!" बाबांनी परवानगी दिली. आणि लग्नाच्या पहिल्या रात्री ती फाईल उघडून बसली!

"हे काय गं?" त्याने थट्टा करण्याचा प्रयत्न केला पण तिचे पाणावलेले डोळे पाहून तो ही कुतूहलाने तिच्या शेजारी बसून फाईल बघू लागला.

त्या 'सोमवारच्या फाईल' मध्ये बाबांनी जपलं होतं तिचं बालपण! सैन्यात कामावर असताना तिच्यासाठी लिहून ठेवलेल्या, घरी येऊन तिला सांगायच्या गोष्टी होत्या त्यात. कधी कुठे तिला आवडेल असं नवीन काही दिसलं, की ते टिपून ठेवलेलं होतं, विसरायला नको म्हणून. तिच्या आवडी, अगदी मैत्रिणींची नावही! डोळ्यांबरोबर मनही भरून आलं तिचं आणि तिला कुशीत घेऊन तिचे अश्रू पुसताना त्याचेही मन हळवे होऊन गेले! त्या 'सोमवारच्या फाईल' ने तिचे बालपण समृद्ध केले होतेच पण पित्याच्या मायेचा एक अनोखा साक्षात्कारही घडविला होता!

खांद्यावर जेव्हा त्याच्या हातांचा स्पर्श तिला झाला तेव्हा भानावर येऊन तिने समोर पहिले तर तो लेकीला निजवून तिची 'सोमवारची फाईल' घेऊन तिच्याजवळ आला होता, म्हणत होता, "आता अशीच फाईल मलाही करायची वेळ आली आहे, हो ना?"

शलाका वाकणकर