वासांची शाळा.

*काही आठवतंय का ?*

14 जून शाळा उघडली..

*वासांची शाळा..*

पुर्वी प्रत्येक महिन्याला वास होता...
त्या वासातच माझ्या बालपणीचा श्वास होता...

पहिला महिना जुनचा...
नविन युनिफॉर्मचा वास,
नविन वह्यापुस्तकांचा वास,
नव्या गमबूटांचा वास,
पेन्सील खोडरबराचा वास....

मग जुलैला पावसाचा दणदणाट..
डब्यातल्या भाजीपोळीचा घमघमाट,
चिखलाच्या वासातून घरची पायवाट
शाळेच्या भिंतींनाही घामाचा वास...

ऑगस्टला विविध राख्यांचा स्पर्श..
तरूण उन्हातील
तेरड्याच्या फुलांचा रंग...
शाळेच्या वाटेवर मित्रमैत्रिणी दंग..

सप्टेंबर ला काकड्या पपनसाचा वास...
गणपतीच्या शाडूचा खास...
उदबत्या भरजरी मखरांचा वास..
करकरणार्या थर्माकोलचा कानाला त्रास...

ऑक्टोबरला उटण्यांची पहाट..
फटाक्यांच्या धुराची हवा दाट..
करंज्या चकल्यांच्या वासाने
नाकाला गुदगुदल्या खास...

नोव्हेंबरच्या सुट्टीत
कॉमिक्स ,चांदोबाच्या
पिवळ्या पानांचा वास...
लायब्ररीजवळच्या गटाराचाही त्रास..

डिसेंबरला लडीवाळ झुंजूमुंजू..
गोदडीला खूपवेळ झोंबू..
गार सकाळी गरम पोहयांचा वास..
गरम पाण्यालाही होता स्पर्श खास..

जानेवारीचा तिळगूळ
आणी बाई आई मावश्यांचे सजणे..
शालूंचा दर्प, गजर्याचा घमघमाट..
हिरव्या बांगड्याचा सळसळाट...

फेब्रूवारीच्या परिक्षा..
प्रश्नपत्रिकेची शाई, उत्तरांची घाई..
फाऊंटन पेनाचा वास..
रस्तावरच्या लिंबूसरबताची आवड खास..

मार्चला क्रिकेटच्या मॅचा...
सुट्टीतल्या रिकामटेकड्या बाता...
गच्चीवर कूरडयांच्या चोर्या...
पिकलेली जांभळे आणी कैर्या..

एप्रिल तसा टेंशनचा...
रिझल्टच्या दिवशी बाकांचा वास नकोसा...
सगळी सुट्टीची मजाच जाई..
कमी मार्कांमुळे कुणाची मान खाली जाई..

मे म्हणजे मरण..
सावल्यांमध्ये बसून बैठे खेळ
घरोघरी लोणची पापडांचे मेळ..
गावी गेलो तर पुढे सरकेच ना वेळ..

आला जून की ढगांचा वास...
हवेचा खास...
नव्या इयत्तेत बाई कोण असतील
त्या कश्या हसतील..
ही उत्कंठा मनातील..

अशी शाळा दहावीपर्यंत...
आपण जगलो...
नाकाने डोळ्यांनी..
मन तसे आता ना राहिले
ना तशी वासांची जुगलबंदी..

*पुर्वी प्रत्येक महिन्याला वास होता..*
*त्या वासातच माझ्या बालपणीचा श्वास होता..*