तो समजला का आम्हाला



दोष देता संभाजीला
तो समजला का आम्हाला
वयात होता जेव्हा कोवळा
नेले दैवाने सईला
काय करावे नशिबाला
तो समजला का आम्हाला |धृ||

धाराऊच्या दुधावर
वाढला राजकुवर
मायस्पर्शाची घरघर
शोधी माय इवली नजर
ओला डोळा गरगर फिरला
तो समजला का तुम्हाला ||१||

सावत्रपण होतेच वाट्याला
वैभव पारखा मातेला
जग झोपता रात्रीला
जाग त्याच्या डोळ्याला
रात राती रडरडला
तो समजला का आम्हाला ||२||

समज नव्हती तेवढी
आग्र्याला मिळाली कोठडी
सोडून एकला उत्तरेला
शिवा बाप निसटला
एकटा जीव मथुरेला
तो समजला का आम्हाला ||३||

जिवंतपणी झाले तेरावे
बापानेच असे करावे
दुःखाची मोठी जखम
कोणी लावावे मलम
उत्तर शोधीत राहिला
तो समजला का आम्हाला ||४||

आजीची होती गाढ माया
तीच धरी सुखाची छाया
इथेही दुदैव आड येई
जिजाई शंभुला सोडून जाई
मायेसाठी शोधू कुणाला
तो समाजाला का आम्हाला||५|

निष्ठावंत ढोंगी चतुर
शंभुला सदा फितूर
कावा पाटीली रचला
बदनाम करी छाव्याला
बाप लेकाशी दुरावला
तो समजला का आम्हाला ||६||

आबा गेला जेव्हा सोडून
नाही दिले त्याला भेटून
रायगडाच्या त्या बापाला
पुरंदरच्या त्या लेकाला
घायाळ शेर विव्हळला
तो समजला का आम्हाला||७||

ख्यालीपणाचे दूषण
व्यसणीपणाचे लांच्छन
पंडित कवी तो भूषण
पराक्रमी राजकारण
बदनाम हेतूने केला
तो समजला का आम्हाला||८||

तोंडावर बोलायचं चोरी
उघडे करी भ्रष्ट अधिकारी
स्वराज्याशी हरामखोरी
आपल्यांचीच फितुरी
खापायची नाही त्याला
तो समजला का आम्हाला||९||

वतनाच्या लोभाने
केला घात मेव्हण्याने
कुंकू पुसण्याचा शपथेने
डाव साधला शिर्क्याने
घफलतीने जेर केला
तो समजला का आम्हाला|१०|

रयतेचा रक्षणकर्ता
जेरबंद झाला होता
त्याला वाचवण्यासाठी
रयत कुठे होती पाठी
मराठा गडी कच  खाल्लेला
तो समजला का आम्हाला||११|

काढली धिंड मराठी राजाची
काढण्या चढल्या हातापायाशी
चक्रव्यूह यवनी चहूबाजूशी
छळ अपार ताशीव शरीराशी
तरी नमला ना झुकला
तो समजला का आम्हाला|१२|

सर्वांगे काढला सोलून
पोळली त्वचा मीठ चोळून
करारी नयना तप्त सळ्या रुतवून
जिव्हा तेज कट्यारी छाटून
अश्रू परी न वाहिला
तो समजला का आम्हाला|१३|

दाखवी औरंग्या भीक जीवाची
होती अट धर्म बदलण्याची
म्हणे राई राई कर तनाची
धर्मापुढे भीती काय मरणाची
धर्मवीर खरा ठरला
तो समजला का आम्हाला||१४|

छाटून मुंडके जल्लोष केला
राइराई तुकडा झाला
अवमान देहाचा केला
नदीपात्रात फेकून दिला
बलिदान असा कुणी न केला
तो समजला का आम्हाला|१५|