*भर मैदानात झालेल्या अपमानाचा बदला त्याने असा घेतला*
Updated: Sep 10 2017 09:38 PM | Written by लोकसत्ता टीम

क्रिकेटच्या खेळात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची सेलिब्रेशनची आपली एक पद्धत असते. नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रिमीअर लिग स्पर्धेत चेडविक वॉल्टन आणि केसरिक विल्यम्स या दोघांमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. केसरिक विल्यम्स हा क्रिकेटमध्ये आपल्या अनोख्या सेलिब्रेशन स्टाईलसाठी ओळखला जातो. प्रत्येक वेळा एखादी विकेट घेतल्यानंतर तो आपल्या खिशातून एक अदृष्य डायरी काढून त्यात आपल्या विकेटची नोंद करुन ठेवतो.
कॅरेबियन लिगच्या एका सामन्यात गयाना वॉरियर्स या संघाकडून खेळताना केसरिक विल्यम्सने जमैका तलावाहच्या चेडविक वॉल्टनला बाद केलं. सुरुवातीला विल्यम्सने या विकेटचं सेलिब्रेशन अगदी साध्या पद्धतीने केलं, मात्र वॉल्टनला माघारी परतताना पाहून विल्यमन्सने आपल्या सवयीप्रमाणे अदृष्य डायरी काढत वॉल्टनच्या चेहऱ्यासमोर नेत त्याच्या विकेटची नोंद केली.
मात्र मैदानात आपल्या झालेल्या अपमानाचा बदला चेडविक वॉल्टनने या दोन्ही संघांमध्ये झालेल्या पुढच्याच सामन्यात लगेचच घेतला. केसरिक विल्यमच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत वॉल्टनने प्रत्येक फटक्यानंतर विल्यम्सच्या अदृष्य डायरीची पानं फाडून टाकली. विल्यम्स आणि वॉल्टन यांच्या द्वंद्वाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
वॉल्टनच्या या फटकेबाजीला मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिलीच, मात्र नेटीझन्सनीही हा व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवर शेअर करत या अनोख्या सामन्याला आपली पसंती दर्शवली आहे.
First Published On: Sep 11 2017 10:10 AM