निर्णय
दुपार टळून संध्याकाळ सुरु झाली होती. त्याच्या लॅविश फ्लॅटच्या ओपन टेरेसमध्ये तो उदासपणे उभा होता. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होइल असं वाटत होतं. प्रत्येकालाच पावसाच्या आधी घरी पोचायची घाई होती. त्याने मात्र मनाशी एक निर्धार पक्का केला होता. बस थोडी हिम्मत झाली कि तो त्याच्या बाराव्या मजल्यावरच्या प्लॅटच्या टेरेसमधून स्वतःला खाली झोकून देणार होता. हिम्मत गोळा करता करता सिगारेटच पाकीट संपत आलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला आणि बघता बघता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि त्यात सोसाट्याचा वारा सगळं वातावरण क्षणात पालटून गेलं होतं. अचानक आलेल्या या पावसामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता. या पावसात तो ही भिजत होता पण उदासपणे .....त्याचवेळी समोरच्या चाळीतली मुले या पहिल्या पावसाचा आनंद घेत पावसात भिजत होती. त्या मुलांना बघून क्षणभर त्याला त्यांचा हेवा वाटला. एरवी या चाळीतल्या मुलांकडे तो तुच्छतेने बघत असे. त्याच्या सो कॉल्ड 'हाय-फाय' लाईफच्या कन्सेप्टनुसार ही चाळ म्हणजे त्यांच्या लॅविश एरियातली घाण होती. पण आज का कुणास ठावूक अचानक त्याच्या मनात या चाळीबद्दल आपुलकी दाटून आली होती. गेल्या काही दिवसांत तो जे अनुभवत होता त्यातून त्याला माणसांची किम्मत कळायला लागली होती. पैशाच्या धुंदीत नेहमी हवेत वावरणारा तो आता हळूहळू जमिनीवर येत होता.
गेल्या चार महिन्यात त्याचं आयुष्यच बदलून गेलं होतं. एका नामांकित मल्टिनॅशनल आय.टी कंपनीत मोठ्या पोस्टवर आणि गलेलठ्ठ पगारावर काम करणारा तो आज बेकार म्हणून घरी बसला होता. अचानक आलेल्या रिसेशनच्या लाटेत त्याची नोकरी गेली होती. गेले चार महिने तो नोकरीच्या शोधात वणवण फिरत होता. अगदी होता त्यापेक्षा कमी पगारावर काम करायचीही त्याची तयारी होती. पण जिथे तिथे 'नो वेकन्सी' ऐकून तो हतबल झाला होता. आधी नोकरी गेली आणि त्यामागोमाग त्याची गर्लफ्रेंडही त्याला सोडून निघून गेली. 'जोवरी पैसा तोवरी बैसा' याची प्रचिती त्याला गेल्या चार महिन्यात आली होती. त्याच्या मित्र मंडळीनीही आता त्याच्याकडे पाठ फिरवली होती. दर विकेंडला पब, पिकनिक, आउटिंग हे सगळे त्याचे मित्र नियमितपणे करत होते पण त्याला मात्र मुद्दाम टाळलं जात होतं. एकेकाळी 'अरे यार चल ना, तू नही तो मजा नही', म्हणणारे त्याचे मित्र असे वागतात हेच त्याला धक्कादायक होतं. त्याला आठवलं; समोरच्या चाळीत रहाणाऱ्या विलासची नोकरी गेली तेव्हा अख्खी चाळ त्याला मदत करायला पुढे आली होती. त्याच चाळीतच रहाणारी विलासची गर्लफ्रेंड त्याला सोडून न जाता खंबीरपणे त्याला साथ देत होती. त्याला डिप्रेशन येउ नये म्हणून जिवापाड जपत होती. अगदी विलासशी कुठलाही संबंध नसताना त्याच्याकडे कामाला येणाऱ्या कामवाल्या बाईनेसुद्धा त्याच्याकडे विलासच्या नोकरीसाठी शब्द टाकला होता. अर्थात तेव्हा पैशाच्या आणि सो कॉल्ड स्टेटसच्या धुंदीत असणाऱ्या त्याने ते तेवढं सिरिअसलीही घेतलं नव्हतं. आज त्याला तो विलास त्याच्यापेक्षा श्रीमंत वाटत होता.
पाकिटातली शेवटची सिगारेट त्याने शिलगावली. एक झुरका घेतला आणि उडी मारण्यासाठी कठड्याजवळ गेला पण तेवढ्यात त्याला समोरच्या रस्त्यावर एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं अगदी पाढरं शुभ्र, पावसात भिजल्यामूळे कुडकुडणारं. गेल्या आठवड्यात त्या रस्त्यावरच्या कूत्रीला चार पिल्ल झाली होती. हे त्यातलच एक पिल्लू होतं. "पण हे एकटं कसं? नेहमी तर सगळी पिल्ल एकत्र असायची ..." त्याच्या मनात विचार आला. त्याने आजूबाजूला बघितलं तर बाकीची पिल्ल आणि त्यांची आई कुठेच दिसेनात. गारठलेलं ते पिल्लू शक्य तितकं अंग चोरुन बसायचा प्रयत्न करत होतं तर मध्येच कुठे आडोसा मिळतोय का ते शोधत होतं. त्यात जिथे तिथे साठलेलं पाणी, ढगांच्या गडगडाटाचा आवाज, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या साऱ्यामूळे ते खूपच बावरुन गेलं होतं. त्याला अचानक त्याची आणि पिल्लाची अवस्था सारखीच वाटली..... आणि क्षणात मनात विचार आला, "गेल्या आठवड्यात जन्मलेलं कुत्र्यासारख्या सामान्य प्राण्याचं पिल्लू जर जगण्यासाठी एवढी धडपड करतय तर मी का असा विचार करतोय? त्या बिचाऱ्याच्या डोक्यावर हक्काचं छप्पर पण नाही तरी ते जगण्याची लढाई लढतय आणि मी मात्र ...... नाही ! मला लढायलाच हवं ....." त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले...... कसलाही विचार न करता तो बिल्डिंगखाली आला आणि पटकन रस्त्याच्या पलीकडे जाऊन त्या पिल्लाला उचलून घरात घेउन आला. त्याचं अंग टॉवेलने पुसलं. रुममध्ये हिटर चालू केला आणि एका डिशमध्ये दुध ठेवून ते त्या पिल्लाला पाजलं. हे सगळं करताना त्याला प्रचंड मानसिक समाधान मिळत होतं. गेल्या कित्येक वर्षात त्याने हे समाधान अनुभवलच नव्हतं. आज मरणाच्या दाराशी जाता जाता त्याला जगण्याचा खरा अर्थ उमजला आणि त्याने जगायचे ठरवले.आठवड्यापूर्वी जन्मलेल्या एका सामान्य कुत्र्याच्या पिल्लामूळे तो भानावर आला होता ..... त्याने निर्णय घेतला होता या पिल्लाला सांभाळण्याचा ....... आता त्याला जगायचं होतं त्या पिल्लासाठी ; स्वतःसाठी ..........आणि जगण्यासाठी लढायचं होतं...न थकता, न थांबता.