‘ब्ल्यू व्हेल’ आणि दहशत
सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय. रशियातील 100 हुन अधिक मुलांनी या गेमपायी आत्महत्या केली आहे. नुकताच भारतात ‘ब्ल्यू व्हेल’ मुळे पहिला बळी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मुंबईतील या घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. या गेम विषयी सांगायचं झालं तर हा गेम रशियाच्या एका तरुणाने तयार केला आहे. आता त्याला अटकही करण्यात आली आहे. त्याचा हा गेम तयार करण्यामागचा उद्देश असा होता की, या जगात काही कमजोर लोक आहेत की त्यांना जगण्याचा अधिकार नाही, त्यांना संपविण्यासाठी त्याने हा गेम तयार केला होता.
*कसा आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम*_ : हा एक व्हिडीओ गेम असून, रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. हा गेम खेळणं सुरु केल्यानंतर तुम्हाला एक ‘मास्टर’ मिळतो. हाच मास्टर तुम्हाला म्हणजेच यूजर्सला पुढचे 50 दिवस कंट्रोल करतो. तो यूजरला दररोज एक टास्क देतो. ज्यामध्ये यूजरला स्वत:च्या शरीराला त्रास द्यायचा असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण झालं की, त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केलं नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात.
*टास्क कसे*_ : हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे, हाताच्या नसा कापणे, ओठांवर ब्लेडने कापणे, पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे, पहाटे उठून हातावर वार करणे, हॉरर चित्रपट पाहणे आणि रात्रभर जागणं, गच्चीवरून उडी मारणे, कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे.
दुर्दैव म्हणजे एकदा का हा खेळ डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही असंही एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले आहे. यामुळे युजर्सची पर्सनला माहिती देखील हॅक होण्याची शक्यताही आहे. आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातली असल्याचे समजत आहे. आतापर्यंत हा गेम भारतात लाँच करण्यात आलेला नाही. असे असले तरी अशा जीवघेण्या खेळापासून तुमच्या मुलांना नक्कीच दूर ठेवा. आता सोशल मीडिया साईट्वर याबाबत अर्लट मेसेजेसही फिरत आहेत.
*पालकांची भूमिका काय?*_ : मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या. त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या. मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा. मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा. चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.