देश सोडण्याच्या व्यथा...
आज प्रत्येक दुसऱ्या घरातला मुलगा परदेशात गेलेला आढळतो. आई-वडिलांनाही त्यात मोठे भूषण वाटते. मुलांना जणू परदेशाची क्रेझच आहे.
आजकाल परदेशात जाणे हे पूर्वीच्या तुलनेत सोपे झाले आहे. जीआरईचा स्कोर बऱ्यापैकी आला तरी एम. एस.साठी अमेरिकेतील कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनच जातो.
भारतात जशी अनेक वेगवेगळ्या ग्रेडची विद्यालये आहेत, तशीच परदेशातही आहेत. त्यांनाही आपल्या देशात आलेला पैसा हवा आहे.
येथे भारतात आपल्याला अमेरिकेतील किंवा कोणत्याही परदेशातील युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज म्हटले की, उत्तमच वाटतात. पण अत्युत्तम, उत्तम, सर्वसाधारण, साधारण अशा दर्जाची युनिव्हर्सिटी-कॉलेज परदेशातही आहेत.
मुलांना शिष्यवृत्ती मिळाली तर उत्तम, अन्यथा आपल्या खर्चाने शिक्षण, म्हणजे आई-वडिलांसाठी प्रचंड खर्चाची बाब असते. मग, कर्ज काढून मुलाची व स्वतःचीसुद्धा इच्छा ते पूर्ण करतात.
एम. एस. नंतर जॉब नाही मग अजून पैसे पाठवतात. मुले टीचिंग किंवा अन्य छोटे- मोठे जॉब करून थोडाफार भार उचलतात. असं होत होत ते तिथेच सेटल होतात. भारतातील मुलगी पाहून लग्न होतं.
आता प्रश्न उरतो आईवडिलांचा!
तब्येती चांगल्या असेपर्यंत आई-वडील परदेशवारी करून येतात. भारतात येऊन परदेशाचे गुणगान गातात. तिथे धुणं-भांडी, झाडू-पोछा, स्वयंपाक (ऐच्छिक) घरीच करतात. पण, इथे कुणाला सांगणार?
हळूहळू नातवंड, त्यांचे शिक्षण, ग्रीन कार्ड, सिटीझनशीप प्रवास करत मुलं तिकडेच कायमचे वास्तव्य करतात.
इकडे आई-वडिलांचा थकता काळ सुरू होतो. बाहेरच्या गरजा कमी होतात. पण, पर्सनल गरजा वाढत जातात.
आज बरं नाही, डॉक्टरकडे कोण नेणार
एकमेकांशी किती व काय बोलणार?
जेव्हा नातवंड अवती-भवती खेळायची असते तेव्हा भकास घरात ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात.
आमची एक मावशी मुंबईत राहते. तिचे यजमान रेल्वेमध्ये फार मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. त्यांना पण परदेशाचं फार कौतुक होतं. दोन्ही मुलांना इंजिनिअरिंगनंतर त्यांनी अमेरिकेला पाठवले. आता दोघेही तिथेच कायमचे वास्तव्याला आहेत.
काही वर्षांपूर्वी मावशीच्या यजमानांचा मृत्यू झाला. मावशी आता एकटीच स्वतंत्रपणे रेल्वे कॉलनीत रो-हाऊसमध्ये राहते. आता वय ७५, तब्येतीच्या कुरबुरी वयोमानाप्रमाणे सुरू असतात.
एकदा चक्कर येऊन पडली. डोक्याला मोठी खोक पडली. भळभळ रक्त वाहिलं. ओढणी बांधली व तशीच ओढणी बांधून ऑटोत बसून दवाखान्यात गेली. जाताना ऑटोवाल्याला सांगितलं की, बाबा रे, मोबाईलमध्ये अमूक-अमूक नंबर आहेत. रस्त्यात काही झालं तर फोन कर. दवाखान्यात नर्सलाही तेच सांगितलं. टाके लावून ती घरी आली.
एकदा व्हर्टिगोचा त्रास झाला. उठणेही मुश्किल होते. मोबाईलवरून फोन करून शेजाऱ्यांना बोलावले. दार कापून लोक घरात आलेत व दवाखान्यात घेऊन गेले. मुलगा पण अमेरिकेतून आला. रात्रीच्या बाईची सोय करून गेला. अजून वय झाल्यावर दिवसभरची पण बाई ठेवण्यात येईल. अशी दृश्ये आता अनेक घरांमध्ये दिसत आहे.
मुल, सुना, नातवंडं वर्षभरातून एकदा येतात. याला भेट, त्याला भेट करत दहा पंधरा दिवस भूर्रकन् निघून जातात.
आई-वडिलांना इतके दिवस साठवलेले कितीतरी भावनिक बोलायचे असते! पण ऐकायला मुलांना वेळच नसतो. अखेर जायचा दिवस उजाडतो. निरोप देताना वृद्ध चेहऱ्यावरच्या डोळ्यांमधील पाणी पाहून त्यांचाही जीव गलबलतो. पण उपाय काय?
मग, अमेरिकेतून स्काइपवर गणपतीची पूजा, सत्यनारायणाची पूजा दाखविली जाते, इंग्रजी बोलणाऱ्या नातवंडांनी हाय ग्रॅण्डमा, हाय ग्रॅण्डपा म्हटले की झालं का?
ही मुलं भारतात राहून उत्कर्ष करू शकत नाही काय?
आपला देश इतका वाईट आहे का? की आपण सुखसमाधानाने एकत्र राहू शकत नाही?
स्पर्धा, मानमरातब, यश, पैसा, ऐशोआराम याच्या धावपळीत आपण आपली नाती विसरत आहोत का?
या प्रश्नांना काहीच उत्तरे नाहीत का ? खरंच अस स्वातंत्र्य अपेक्षित आहे का,,,,,,,,,?