टेक्नॉलॉजीमुळे नात्यातली गुंतागुंत वाढत आहे

आजची पिढी सेलफोन आणि सोशल मीडियाची गुलाम  बनली आहे.
सोशल मिडिया, सेलफोन आणि टेक्नॉलॉजीने आजच्या पिढीच्या जीवनावर कब्जा मिळवला आहे. अर्थात टेक्नॉलॉजीचे असंख्य फायदे आहेत हे कोणी नाकारणार नाही. मात्र, सर्वात मोठा धोका म्हणजे याच टेक्नॉलॉजीने आपल्या भावनिक आणि सामाजिक जीवनावर आक्रमण केलं आहे.
याचं ठळक उदाहरण म्हणजे लोक त्यांचं दु:ख प्रत्यक्षात कोणाजवळ अथवा जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त न करता सोशल मीडियात व्यक्त करत आहेत आणि हा काळजीचा विषय आहे.
लोकांना ट्विटर अथवा फेसबुकवर स्वत:च्या भावना उघड्या करायला का आवडतात? कदाचित स्वत:ची दुर्बलता न दिसू देता. कुठल्या प्रश्नांची उत्तरं न ध्यावी लागता किवा स्पष्टीकरण न देता आपल्या भावना व्यक्त करण्याचं हे सोपं मध्यम लोकांना वाटत असावं हे त्यामागचं कारण असू शकतं.

गुंतागुंत वाढली आहे
खरोखरंच टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियामुळे पूर्वीच्या तुलनेत नात्यातली गुंतागुंत वाढली आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटायचे आणि पुन्हा पुन्हा भेटायची अपेक्षा करायचे. पूर्वी एखाद्या व्यक्तीशी जोडून घेणं, तिला भेटण्याचा मोह होणं आणि ती इच्छा  प्रत्यक्षात येणं या गोष्टी नियतीच्या हातात होत्या. योगायोगाने परत भेट झाली तर पुढे काय करायचं याचा विचार व्हायचा. आज माणसं मोहाच्या अधीन झाली आहेत  आणि टेक्नॉलॉजीमुळे कोणाशीही कनेक्ट होणं शक्य झालंय. याचा एक तोटा म्हणजे आपल्या अंत:प्रेरणेचा आवाज क्षीण झाला आहे. टेक्नॉलॉजीमुळे जसं नवं नातं जोडलं जाऊ शकतं, त्याचप्रकारे हातातून नातं निसटून जाण्याची शक्यता असते. एक चुकीचा मेसेज किंवा ई-मेल, एखादा चेष्टेखोर किंवा सूचक टेक्स्ट मेसेज नात्यात दुरावा निर्माण करायला पुरेसा ठरतोय.
फायदे आहेत : पण….
टेक्नॉलॉजीचे फायदे कोणीही अमान्य करणार नाहीत. टेक्नॉलॉजीमुळे संवादात आणि डेली इंटरअँशनमध्ये  कमालीची सहजता आली आहे. हॉटेल , हॉलिडे , मूव्ही , बुकिंगपासून बँकचे व्यवहार…सगळीकडे टेक्नॉलॉजीमुळे सहजता आली आहे. मात्र, त्याचवेळी याच टेक्नॉलॉजीमुळे  लोकांच्या भावनिक आणि सामाजिक जीवनावर आक्रमण झालं आहे. एक भीतीदायक गोष्ट म्हणजे आजच्या पिढीची जडण-घडण अशी झाली आहे कि सगळे मोबाईलचे गुलाम बनले आहेत. फोन नंबर्स आणि पत्ते लक्षात ठेवायची सवय सुटलेली आहे. तारखा, भेटीच्या वेळा, रोजचं शेड्युल या सगळ्यासाठी टेक्नॉलॉजीवर अवलंबून झाल्या आहेत. अगदी थोडक्या भाषेत सांगायचं तर टेक्नॉलॉजीमुळे नात्यात गुंतागुंत निर्माण झालेली आहे. आता टेक्नॉलॉजीच्या अधीन व्हायचं कि अधीन ठेवायचं याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.