आई बाळाचे संगोपन

दिवस राह्ल्यापासून मूल मोठं होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ? आरोग्याची व्याख्या ही वर्षावर्षाला बदलत आली आहे आणि आज आपण आरोग्याची व्याख्या अशी करतो - शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास, रोग व्याधी मुक्त असे आनंदी बालपण आणि सृजनशील प्रौढात्व म्हणजे आरोग्य होय. ही व्याख्या जर पालकांनी विशेषतः मातांनी समजावून घेतली, तर आदर्श माता कशी असावी हे समजणं फारसं अवघड नाही.
आपण गर्भवती आहोत या गोष्टीचा स्त्रीला आनंद व्हायला हवा. तिनं गर्भारपणातही आनंदी मोकळ्या मनानं राहायला हवं. बाळाचं आगमन तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. तो क्षण यशस्वी होण्याच्या दृष्टीनं सर्वांगीण तयारी करायला हवी. गर्भाची संपूर्ण वाढ होण्याच्या दृष्टीनं तिनं मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडून देता कामा नये, प्रथिने, खनिजे, कॅलरीज आणि जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळतील असा आहार तिनं गर्भारपणात घ्यायला हवा. दूध, फळे, पालेभाज्या असा आहार उत्तम. तसंच मांसाहार करणाऱ्या स्त्रियांनी अंडी, मांस, मासे या काळात आपल्या आहारात घेत जावे.आवश्यकतेपेक्षा जास्त आहार आणि पोषणाला अयोग्य असं अन्न खाण्यात आलं तर अपचन होत असतं. गर्भारपणी अपचन होऊ न देण्याची खबरदारी गर्भवती स्त्रियांनी घेणं आवश्यक असतं. ज्या ठिकाणी नाना तऱ्हेच्या माणसांशी बराच काळ संपर्क येऊ शकतो, अशा ठिकाणी गर्भवतींनी जाण्याचं टाळावं. सिनेमागृह हे असं ठिकाण असतं की तिथं रोज हजारो माणसं येत असतात. तीन तास बसत असतात. ही येणारी माणसं कुठल्यातरी विकारांनी आजारी असू शकतात. कुणाला सर्दी, खोकला तर कुणाला गुप्तरोगासारखे विकार झाले असण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी तीन तास बसणं हे गर्भवती स्त्रीच्या दृष्टीनं अपायकारक ठरू शकतं. त्यापेक्षा मोकळ्या हवेत फिरणं उद्यानात बसणं ठीक. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध गरोदर स्त्रीनं घेऊ नये. ते धोकादायक असतं एवढंच नाही, तर त्या काळात ओटीपोट दुखतं म्हणून किंवा आत हालचाल होऊन त्रास होतो म्हणून ओटीपोट दाबणं किंवा त्याला मसाज करणंही अत्यंत अयोग्य असतं.आपल्या होणाऱ्या बाळाला जास्तीत जास्त काळपर्यंत अंगावरचं दूध पाजण्याची तयारी आईनं दाखवायला हवी. जर अशी मनाची तयारी झालेली असेल, तर मग दूध कमी येण्याची तक्रारच उद्भवणार नाही. डॉक्टर आणि नर्स सांगतील त्याप्रमाणं आपल्या स्तनाग्रांची तिनं काळजी घेतली पाहिजे. नियमितपणे तपासणी, योग्य पथ्यपाणी, कोणत्याही संसर्गापासून दूर राहणं, शरीरावर तसंच मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देणं, अतिरिक्त धूम्रपान आणि मद्यसेवन न करणं, अशा तऱ्हेनं स्त्रीनं गर्भारपणाच्या काळात काळजी घेतली तर गर्भाची सर्वांगीण वाढ होण्याच्या दृष्टीनं चांगलीच मदत होते. मुख्य म्हणजे बाळंतपण हे सुसज्ज अशा इस्पितळात किंवा निष्णात डॉक्टरांकडेच करणं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण बाजुंनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आणि हा विकास, ही वाढ कोणत्याही रोगविकाराची बाधा न होऊ देता होण्यासाठी आईनं बऱ्याच गोष्टी लक्षपूर्वक आणि कटाक्षानं पाळायला हव्यात.